पिंपळगाव माळवी तलावाच्या अनधिकृत विहिरींचा ताबा घेण्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीने महापालिकेकडे निवेदन दिले आहे. तलावात अतिक्रमण, अवैध पाणीउपसा आणि भूमी खरेदी-विक्री सुरू असून, महापालिकेच्या उदासीनतेमुळे परिसरात नाराजी आहे.
अहिल्यानगर- शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकेकाळी संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या या तलावाकडे महानगरपालिचे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण, बेसुमार पाणी उपसा आणि वृक्षतोड यामुळे तलावाला उतरती कळा लागली आहे.
मागील आठवड्यात तलावात खोदलेल्या अनधिकृत विहिरीचा ताबा मिळवण्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. तलावाच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे स्थानिक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून, प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष
पिंपळगाव माळवी तलावाचे सुमारे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या तलावाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या घोषणा अनेकदा झाल्या, परंतु प्रत्यक्षात महापालिकेने तलावाची मोजणी किंवा हद्द निश्चितीही केलेली नाही. परिणामी, तलावात खासगी व्यक्तींकडून अनधिकृत विहिरी आणि कूपनलिका खोदल्या जात आहेत. काहींनी तलावातील जमीन अनधिकृतपणे खरेदी-विक्री केल्याच्या चर्चाही परिसरात सुरू आहेत. तलावाच्या भिंतीवर काटेरी झुडपे वाढली असून, अवैध पाणी उपसा आणि गौण खनिजांचे उत्खनन सर्रास चालते. याकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
अनेक गांवाची भागते तहान
तलावातून जेऊर, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, डॉगरगण आणि मांजरसुंबा गड या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या तलाव कोरडाठाक पडल्याने या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जेऊर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून, येथील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तलावातील विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने खासगी व्यक्तींना तलावात विहिरी आणि कूपनलिका खोदण्याची परवानगी कशी दिली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
तलावात अनधिकृत विहिरी
मागील आठवड्यात तलावात अनधिकृत विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेने संबंधितांवर गुन्हा दाखल केला. या विहिरीचा ताबा जेऊर ग्रामपंचायतीला देण्याची मागणी मंगळवारी (२२ एप्रिल) ग्रामपंचायतीने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तलावाच्या खोलीकरणासाठी माती (पोयटा) उचलताना काही खासगी व्यक्ती तलावाच्या क्षेत्रावर मालकी हक्क सांगत असून, माती उचलण्यासाठी पैसे आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे तलावाभोवती खासगी व्यक्तींचा विळखा वाढत आहे. महापालिकेच्या या उदासीनतेमुळे स्थानिक गावांचे पाणीप्रश्न गंभीर बनले आहेत.
ठोस उपाययोजना करणे गरजेचे
तलावातील आदिवासी समाजाच्या अतिक्रमणाचा प्रश्नही गंभीर आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी अनेकदा आश्वासने दिली, परंतु प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. या समस्येकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात महापालिका आणि आदिवासी समाजात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. तलावाचे संरक्षण आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. जेऊर ग्रामपंचायतीच्या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








