श्रीगोंदा (अहमदनगर): तालुक्यातील खरातवाडी (पिंपळगाव पिसा) परिसरात हंगा नदीवर ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेले दगड-मातीचे तात्पुरते पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टर पुरवण्याची मागणी करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संपर्क तुटल्याने गावांमध्ये अडचणीचे सावट
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हंगा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने दगड-मातीचे पूल पुराच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे खरातवाडी, एरंडोली, इजिमा २०२ मुख्य रस्ता, इथापे मळा, टेकाड वस्ती, काठेवाडी वस्ती, पंदरकर वस्ती, भापकर वस्ती आणि अन्य वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि विशेषतः विद्यार्थी, वृद्ध आणि महिला यांना रोजच्या गरजांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाकडे वारंवार मागण्या पण उपाययोजना नाहीच!
ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा सिमेंटच्या भक्कम पुलासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. परिणामी, ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून तात्पुरते पूल उभारले, जे दरवर्षी पावसात वाहून जातात. यामुळे प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून, ते मार्ग लांब, खर्चिक आणि धोकादायक आहेत.
ग्रामस्थांची हेलिकॉप्टरसाठी थेट मागणी
या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी आता संतप्त होत जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, प्रशासन जर सिमेंटचा पूल बांधू शकत नसेल, तर किमान शालेय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून प्रवासाची सुविधा द्यावी. ही मागणी ग्रामस्थांच्या हतबलतेचे आणि प्रशासनावरील अविश्वासाचे दर्शन घडवते.








