खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; हवामानाचा अचूक अंदाज, खत आणि पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आता मोबाईलवर

0
57

अहिल्यानगर : बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतीतील अनिश्चितता वाढली असतानाच, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आता ‘मेघदूत’, ‘आयएमडी’ आणि ‘स्कायमेट’ या मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज, पीक पद्धती आणि खत वापराविषयी सल्ला शेतकऱ्यांना थेट त्यांच्या मोबाईलवर मिळू शकतो.

शेती हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्याने, हवामानात होणारे अचानक बदल शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरतात. मात्र, वरील ॲप्समुळे आता पेरणीपासून ते साठवणूकपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैज्ञानिक माहिती मिळत असून, शेतीत योग्य नियोजन शक्य झाले आहे.

हवामान आधारित शेतकरी निर्णय

हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. पेरणीपूर्वी पावसाचा अंदाज योग्य असेल तर बीजांकुरण सुधारते, तर कापणीच्या वेळी कोरडे हवामान असणे आवश्यक ठरते. याशिवाय, मळणी, साठवणूक व फवारणीसाठीही हवामानाचा मोठा प्रभाव असतो. ‘मेघदूत’, ‘आयएमडी’ व ‘स्कायमेट’ ही ॲप्स पुढील पाच ते सात दिवसांसाठी हवामानाचा अंदाज देतात, ज्यामुळे शेतकरी योग्य वेळी शेतीसंबंधी निर्णय घेऊ शकतात.

मेघदूत : शेतकऱ्यांसाठी खास ॲप

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने संयुक्तपणे विकसित केलेले ‘मेघदूत’ हे ॲप खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर हवामानाचे पाच दिवसांचे पूर्वानुमान, तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग या सर्व गोष्टींची माहिती यामध्ये उपलब्ध आहे. यासोबतच कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक, खतांचा वापर, सिंचन सल्ला आणि पीक निवडीसाठी मार्गदर्शन मिळते. या ॲपची खासियत म्हणजे हे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीही याचा सहज वापर करू शकतात.

आयएमडी आणि स्कायमेट : हवामानावर आधारित अलर्ट्स

‘आयएमडी’ (IMD) हे भारत सरकारचे अधिकृत हवामान खातं असून, हे ॲप नागरिकांना विविध हवामान बदलांविषयी सतर्क करतं. विशेषतः अतिवृष्टी, गारपीट, वादळ अशा घटनांपूर्वी यलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट्सद्वारे शेतकऱ्यांना सूचित केलं जातं. दुसरीकडे, खासगी क्षेत्रातील ‘स्कायमेट’ हे ॲप उपग्रह डेटा आणि विश्लेषणाच्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज देतं. यामध्ये हवामानासोबतच शेतीसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले देखील दिले जातात.

अधिक उत्पादनासाठी आधुनिकतेची जोड

तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी सांगितले की, “आजच्या बदलत्या हवामानात अचूक अंदाज आणि सल्ला मिळणं ही काळाची गरज आहे. या ॲप्स केवळ माहिती देत नाहीत, तर त्याआधारे पीक व्यवस्थापनाची संपूर्ण दिशा देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात वाढ होते.”

शेतीतील धोके कमी करण्यासाठी आणि अधिक नफा मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. आधुनिक ॲप्सच्या माध्यमातून शेतकरी आता अधिक जागरूक, सजग आणि शास्त्रीय पद्धतीने शेतीकडे वाटचाल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here