मुंबई : शेतकऱ्यांना कर्ज मिळताना सिबिल स्कोअरची अट घालणाऱ्या खासगी बँकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच सुनावलं आहे. ICICI, HDFC आणि Axis बँकांसह इतर बँकांनी शेतकऱ्यांकडून सिबिल मागू नये, असा ठणकावून इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे निर्देश आधीच स्पष्ट असून, तरीही जर बँका सिबिलची अट लावत असतील, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरला.
मुंबईत पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट करत बँकांना गरज पडल्यास एफआयआर दाखल करण्याचाही इशारा दिला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी हा देशाचा पोशिंदा, त्याच्यावर अन्याय नको
मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांकडून सिबिल मागू नका, हे मी अनेकदा सांगितलं आहे. तरीही काही बँका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही अशा बँकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. पण आता तुम्हालाच हे गांभीर्याने घ्यावं लागेल. फक्त आदेश पुरेसे नाहीत, कृतीत बदल हवा.”
बँकांनी सहकार्य वाढवावं, शेतीसह स्टार्टअप्सलाही चालना द्यावी
फडणवीस म्हणाले की, यंदा दुष्काळाची स्थिती नाही, त्यामुळे चांगलं उत्पादन अपेक्षित आहे. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर आणि सहज कर्ज देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात FPOs आणि MSMEs आहेत. तसेच १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप्सचं राजधानी बनत आहे, त्यामुळे बँकांनी शेतीसोबतच नवउद्योजकांनाही हातभार लावावा.
“गडचिरोलीकडे लक्ष द्या, आर्थिक समावेश साधा”
गडचिरोलीसारख्या भागांमध्ये उद्योग जाळं उभं राहत आहे. बँकांनी अशा भागांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या युवकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अंमलात आणणं ही केवळ सरकारची नाही, तर बँकांचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
चांगले काम करणाऱ्यांचा गौरव, टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई
मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांचा सन्मान करा. पण जे जबाबदारी झटकत आहेत, त्यांची नावं पुढील बैठकीत सादर करा आणि त्यांच्यावर कारवाई करा.”
शेतकऱ्यांना सिबिलची अट नाही
शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणं हे पूर्णतः चुकीचं असून, यामुळे ते खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. हे लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आणि राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, त्या पाळल्या जात नसल्यामुळे सरकारने आता अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. बँकांनी सरकारच्या पाठिशी उभं राहत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.








