अहिल्‍यानगरमध्‍ये संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा मोठा अभिमान – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

0
75

अहिल्‍यानगर : संत साहित्‍य केवळ धर्मापुरते आणि भक्‍तीपुरते सिमीत नाही तर, समाजाच्‍या उध्‍दाराकरीता उपयुक्‍त ठरले आहे. या संत साहित्‍याने समाजामध्‍ये सत्‍व आणि तत्‍व रुजवितानाच समाजाला सत्‍य सांगून विषमता दुर करण्‍याचे मोठे काम केले असल्‍याचे गौरद्गार १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे स्‍वागताध्‍यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले.

वारकरी साहित्‍य परिषदेच्‍या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक न्‍याय मंत्री ना.संजय शिरसाठ यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी राज्‍यातून आलेल्‍या संत साहित्‍य क्षेत्रातील मान्‍यवरांशी संवाद साधून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी या संमेलना मागील भूमिका विषद केली. वारकरी साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष विठ्ठल पाटील, जेष्‍ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे, संमेलनाचे नुतन अध्‍यक्ष संजय महाराज देहूकर, मावळते अध्‍यक्ष माधव महाराज शिवडीकर यांच्‍यासह राज्‍यातून आलेले वारकरी आणि संत साहित्‍याचे अभ्‍यासक याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, संतांनी भूमी म्‍हणून ओळखल्या जाणा-या अहिल्‍यानगर मध्‍ये १३ वे संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा आमच्‍या दृष्‍टीने फार मोठा अभिमान आहे. या जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यात असलेले अध्‍यात्मिक ठिकाण हे आमच्‍या दृष्‍टीने मोठी उपलब्‍धी असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, या अध्‍यात्म्कि दृष्‍टीचा प्रेरणास्‍त्रोत हा पंढरपुरचा पांडुरंग आहे. आणि देहू आळंदी तिर्थस्‍थान संत धर्माची लोक विद्यापीठं आहेत. समाजाच्‍या प्रत्‍येक स्‍तरातून संतरुपे व्‍य‍क्‍त झाली. त्‍यांनी त्‍यांच्‍या जीवनातून साधूत्‍वाचे उद्दात आदर्श प्रगट केले. संतांच्‍या या कार्यातूनच भक्‍तीरुप अवतरले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हजारो वर्षांची परंपरा असलेली आषाडीची वारी ही म‍हाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे प्रवाही सजीव रुप आहे. ज्ञानोबा, तुकोबा हे या संस्‍कृतीचे स्‍वास आहेत. संत नामदेवांनी या संस्‍कृतीचा भारतभर प्रचार केला तर, संत एकनाथांनी धर्म मंदि‍राचे आधार बनण्‍याचे काम केले, असा उल्‍लेख करुन, ना.विखे पाटील म्‍हणाले की, संत साहित्‍यातून व्‍यक्‍त होणारी भावदृष्‍टी आणि भावसाधना यांचे आकलन होणे महत्‍वाचे आहे, कारण संत साहित्‍यानेच भक्‍ती आणि सामाजिक शक्‍तीचा संदेश आपल्‍याला दिला आहे. या देशाला भक्‍तीच्‍या एका सुत्रात ववण्‍याचे काम संत साहित्‍याने केले असल्‍याचा गौरवपुर्ण उल्‍लेख त्‍यांनी आपल्‍या भाषणात केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here