पाथर्डीतील शिक्षक विजय गर्जे याने तपासात मदतीसाठी सहायक पोलिस निरीक्षकांसाठी १.५ लाख रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तडजोडीअंती ३० हजारांची लाच घेतल्यावर त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाथर्डी – सुगंधी तंबाखू प्रकरणात सौम्य कारवाई आणि तपासात सहकार्य करण्याच्या बदल्यात सहायक पोलिस निरीक्षकासाठी लाच स्वीकारणाऱ्या शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रविवारी (२० एप्रिल २०२५) सायंकाळी ही कारवाई झाली.
आरोपी शिक्षक विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पाथर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदार आणि त्यांचा भाऊ पान टपरी आणि शेतीचा व्यवसाय करतात. ४ एप्रिल २०२५ रोजी पाथर्डी पोलिसांनी तक्रारदाराच्या घराजवळील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याचे साहित्य जप्त केले. या कारवाईदरम्यान, एका व्यक्तीने तक्रारदाराला शिक्षक विजय गर्जे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
तक्रारदाराने गर्जे यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, तक्रारदाराच्या भावावर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ नये आणि तपासात मदत मिळावी यासाठी सहायक पोलिस निरीक्षकाला दोन लाख रुपये द्यावे लागतील. यानंतर तक्रारदाराने ऑनलाइन पद्धतीने गर्जे यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यात ५० हजार आणि नातेवाइकांच्या खात्यातून १ लाख रुपये, असे एकूण दीड लाख रुपये पाठवले.








