स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: सुरतमधून केली अटक; गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित, पैसे परत न करता गेला होता पळून
अहिल्यानगर : शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली सामान्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साईनाथ कवडे (वय २३, रा. कुरूडगाव, ता. शेवगाव), याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत येथून अटक केली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे
आरोपीची एसिटेक सोल्यूशन ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास भरभक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित आरोपीने अनेकांना गंडा घातला. त्याच्या कंपनीमध्ये अनेकांनी पैसे गुंतविले शेवगाव येथील अवधूत विनायक केदार यांनीही एसिटेक सोल्यूशन कंपनीत १ कोटी ६१ लाखांची गुंतवणूक केली होती. परंतु, आरोपीने त्यांना पैसे परत केले नाहीत. मुळ मुद्दल परत न करता कवडे हा पळून गेला होता. त्यांनी याबाबत शेवगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तेंव्हापासून पोलिस कवडे याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना चकवा देत होता. मोबाईल बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. तांत्रिक विश्लेषणात तो सुरत येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत गाठले. सुरतमधून आरोपीला अटक केली, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
गावापासून केली सुरुवात
कवडे याने स्वतःच्या कुरूडगाव रावतळे या गावात शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरू केले. त्याने भरमसाट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला गुंतवणुकीवर १२ ते २० टक्के असा भरभक्कम परतावा मिळत असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. अनेकांनी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. काहींनी शेती, घर, प्लॉट विकून तर काहींनी सोने, इतर बँकेतील ठेव पावत्या मोडून गुंतवणूक केली. साधारण एक वर्षापूर्वी अनेकांना परतावा मिळत नसल्याने त्याच्या कार्यालयात खेटा मारण्यास सुरुवात झाली.
कवडेची कारही जप्त
दरम्यान, कवडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्यांची कार किशोर शिवाजी जाधव (रा. तिसगाव, ता. पाथडी) याला दिली होती. ही कार गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जप्त केली असून, त्याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.








