अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

0
111

चौंडी गावात झालेली ऐतिहासिक बैठक; ६८१ कोटींचा स्मृतीस्थळ प्रकल्प, मंदिर विकास, वैद्यकीय शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर

अहिल्यानगर — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी (अहिल्यानगर) येथे नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीही या बैठकीला उपस्थिती होती.

ज्या चौंडी गावाची लोकसंख्या अवघी दीड हजार आहे, त्या गावात झालेली ही बैठक ऐतिहासिक ठरली. येत्या महिनाभर चौंडी परिसरात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील मुख्य निर्णय पुढीलप्रमाणे:

१. अहिल्यादेवी स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन
चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाच्या संवर्धनासाठी ६८१ कोटींच्या भव्य प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. हे स्थळ अखिल भारतीय तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

२. मंदिर विकासासाठी ५,५०३ कोटींचा निधी
राज्यातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खालीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे:

  • अष्टविनायक गणपती मंदिर: ₹१४७ कोटी
  • श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर: ₹१,८६५ कोटी
  • श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर: ₹२५९ कोटी
  • त्र्यंबकेश्वर मंदिर: ₹२७५ कोटी
  • श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर: ₹१,४४५ कोटी
  • श्री क्षेत्र माहुरगड: ₹८२९ कोटी

३. अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपट
अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित बहुभाषिक चित्रपट तयार करण्यात येणार असून, त्यातून त्यांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचवले जाईल.

४. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना
अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामुळे स्थानिकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

५. महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आदिशक्ती अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ दिले जातील. तसेच, मुलींसाठी ITI सुरू करण्यात येणार आहे.

६. धनगर समाजासाठी ‘यशवंत विद्यार्थी योजना’
धनगर समाजातील १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात शिक्षणासाठी संधी देणारी ‘यशवंत विद्यार्थी योजना’ सुरू होणार आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मिती देखील प्रस्तावित आहे.

या ऐतिहासिक बैठकीत घेतलेले निर्णय अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत असतानाच स्थानिक विकासालाही चालना देणारे ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here