अहिल्यानगर : ऑडीट फी, भ्रष्टाचार, कर्मचारी भरती, अशा विविध मुद्यांवर विरोधकांनी सत्ताधार्यांना घेरले, तर सत्ताधार्यांनी कर्जाचा अल्प व्याजदर आणि पारदर्शी व स्वच्छ कारभार असल्याचा दावा करत विरोधकांची मुद्दे खोडले. त्यामुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याचे दिसते आहे. उद्या रविवारी 23 रोजी 21 जागांसाठी मतदान, तर 24 रोजी मतमोजणी होणार असल्याने या निकालाकडे लक्ष असणार आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. उद्या रविवारी 9115 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तत्पूर्वी सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनात आणि मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव खुळे यांच्या नेतृत्वात मंडळाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे विरोधी स्वाभीमानी परिवर्तन मंडळाचे नेते राजेंद्र लांडे, सुनील पंडीत, आप्पासाहेब शिंदे यांनी एकत्र येऊन एकास एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली. विरोधकांनी सत्ताधार्यांवर 95 लाखांची ऑडीट फिवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले.
तसेच 95 लाख ऑडीटरला देऊनही 90 लाखांचा संस्थेला दंड का बसला, दोन शाखा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने का बंद केल्या होत्या, असा सवाल केला. याशिवाय अनावश्यक कर्मचारी भरती, तसेच मयत कल्याण निधी योजनेचा गळा घोटला, अजुनही अनेकांच्या कुटुंबांना ठेवीची रक्कम मिळालेली नाही, कृतज्ञता निधीतही 23 हजार ठरले पण हातात 17 हजार टेकवले, येथेही नियोजन कमी पडले, ऑनलाईन शाखेच्या नावाखाली पैसे मोजले पण सेवा अजुनही सुरू नाहीत, घटनेप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरही खुर्ची सोडत नाहीत, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधार्यांवर आरोप केले.तसेच आम्ही ठेवींचा व्याजदर वाढविणार आहोत, शैक्षणिक कर्जही कमी व्याजदरात देणार आहोत, मुलींसाठी संकुल उभारू, अशा वेगवेगळ्या संकल्पना विरोधकांनी सभासदांसमोर मांडल्या आहेत. तसेच सत्ताधार्यांना चेहराच नसल्याचा मुद्दा करत 1 हजार मतांनी 21-0 चा विजयी दावा विरोधकांनी केला आहे.
तर, सत्ताधार्यांनी विरोधकांना व्हाईट वॉश देण्याची प्रतीज्ञा केली. अनावश्यक भरती केलेली नाही. उलट ताळेबंदानुसार 2 टक्के खर्च व्यवस्थापनावर करू शकतो, मात्र आपला खर्च हा 0.52 टक्के आहे, हा मुद्दा सभासदांसमोर मांडला.तसेच ऑडीट फीचे आरोप निरर्थक आहेत. त्याचे टेंडरींग होत नाही, शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच ही फी असते, त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप हास्यापद असल्याचेही सत्ताधारी प्रचारात सांगताना दिसले. ऑडीटरच्या चुकीने संस्थेला कोणताही दंड झालेला नाही, कोणत्याही शाखा बंद नव्हत्या, हे सांगण्यासही सत्ताधारी मागे दिसले नाहीत. 2016 पासून सभासदांना ऑनलाईन अकाऊंट चेक करता येते, त्यामुळे ऑनलाईन सेवा बंद असल्याचे आरोपही सत्ताधार्यांनी खोडून काढल्याचे दिसले. मयत कल्याणसाठी निधी कमी पडतोय, मात्र त्यातही सुधारणा केली असून, लवकरच यात सुरळीतता येईल, अशी ग्वाही सत्ताधारी देताना दिसले. याशिवाय कृतज्ञता निधीबाबतही सभासदांना विश्वासात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर कर्जाची मर्यादा ही 21 लाखांहून टप्प्याटप्याने 30 लाखापर्यंत नेण्याचा मास्टरस्ट्रोकही त्यांनी मारल्याचे प्रचारात दिसले. त्यात भर म्हणजे विरोधकांच्या हातात सत्ता गेल्यास विश्वासाहर्ता राहणार नाही, लोकं ठेवी काढून घेतील, संस्थेचे वाटोळे होईल, अशी भितीही सत्ताधारी व्यक्त करताना भावनिक साद घालत आहेत.
दरम्यान, सत्ताधार्यांवर आरोप करून विरोधकांनी केलेली कोंडी, तर सत्ताधार्यांनी केलेला बचाव, यामध्ये सभासद नेमके कोणावर विश्वास ठेवून संस्थेच्या चाव्या ताब्यात देतात, हे सोमवारी मतमोजणीतून दिसणार आहे.








