नगर पोलिस दलावर पुन्हा डाग : लग्नाचे आमिष दाखवून पोलिस निरीक्षकाचा महिलेवर अत्याचार?

0
28

अहिल्यानगर : नगर पोलिस दलावर पुन्हा एकदा गंभीर आरोप लागले आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर मुंबईतील ३० वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली आहे. २२ सप्टेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून तपासासाठी हे प्रकरण पालघर जिल्ह्यातील मानोर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

फिर्यादी महिला मूळची पश्चिम बंगालची असून ती सध्या मुंबईत राहत होती. तिची दराडे यांच्याशी २०२३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांनी लग्नाचं आश्वासन देत तिच्याशी संबंध ठेवले. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या काळात मुंबई आणि पालघर येथे तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले, असा आरोप आहे. विरोध केल्यावर तिला धमकावण्यातही आल्याचे महिलेने म्हटले आहे.

या प्रकरणात दराडे यांच्यावर बीएनएस कलम ६९, ३५२ आणि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. परंतु प्रकरणाची नोंद करताना पोलिसांकडून टाळाटाळ झाली, अशी चर्चा शहरात आहे. अखेर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर महिला पोलिस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्यात आला.

 याआधीही कोतवाली ठाण्यात काम करणाऱ्या एका निरीक्षकावर महिलेने असाच गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा त्याच ठाण्यातील निरीक्षकावर गुन्हा नोंदवल्याने पोलिस दलाची प्रतिमा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. यापुढे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे कशी भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here