अहिल्यानगर : राज्यात शालेय पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, शिक्षण विभागाने या पार्श्वभूमीवर एक नवा शासन निर्णय जारी केला आहे. यानुसार, जेवण विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक किंवा स्वयंपाकघरातील मदतनीस यांनी पोषण आहार चाखून पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत मत नोंदवहीमध्ये नोंदवली जाईल.
या निर्णयात स्वयंपाकघरातील सुविधा, स्वच्छता आणि अन्न हाताळण्याचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी अन्नातून विषबाधा झाल्यास दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांना यामध्ये विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये अन्नाची गुणवत्ता तपासणे, त्याचे नमुने २४ तास जपून ठेवणे, अन्न हाताळण्यापूर्वी स्वच्छता राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरलेले धान्य, मसाले इत्यादी साहित्य एक वर्ष टिकणारे असावे, अशी अट आहे. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलटी, ताप, पोटदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीला पुरवठादारांकडून येणाऱ्या तांदूळ, तेल, मीठ, मसाले यांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. माल स्वीकृतीपूर्वी दर्जा चांगला असल्याची खात्री करणे, शिजवलेल्या अन्नाची नियमित तपासणी करणे, स्वयंपाकघर व परिसरात किडे, उंदीर, झुरळे यांचा वावर होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत.
पोषण आहारासाठी पुरवठादारांच्या गोदामांची स्वच्छता तपासली जाणार असून, अन्न महामंडळ व शिक्षण विभागाचे अधिकारी यासाठी जबाबदार असतील. गोदाम अस्वच्छ आढळल्यास प्रथम वेळी ५० हजार आणि दुसऱ्या वेळी १ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. अशा प्रकारे शासनाने शालेय पोषण आहारात दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कडक नियम लागू केले आहेत.








