पाथर्डी : तालुक्यातील एका शाळेत चौथीत शिकणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या मुलीवरच शिक्षकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर ती जखमी झाली असून, हा प्रकार शिक्षक आणि गावातील एका स्थानिक नेत्याने दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही सतर्क नागरिकांनी चाईल्ड लाईनकडे तक्रार करत हा प्रकार उघडकीस आणला.
सदर पीडित मुलगी परप्रांतीय कुटुंबातील असून ती गावातील शाळेत शिक्षण घेत आहे. शिक्षकाने वर्गात असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत जबरदस्तीचा प्रयत्न केला. या प्रसंगी विद्यार्थिनीने प्रतिकार केला आणि त्यामुळे ती किरकोळ जखमी झाली.
या प्रकारानंतर मुलीच्या पालकांनी गावातील एका स्थानिक नेत्याकडे तक्रार केली. परंतु, संबंधित नेत्याने “गावात राहायचे असेल, तर पैसे घेऊन शांत बसा” असा दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे कुटुंब घाबरून गेले होते.
दरम्यान, गावातील काही नागरिकांनी ही माहिती पाथर्डी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पोहोचवली. यानंतर काही अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाची प्राथमिक चौकशी केल्याचे समजते. गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही.
ही घटना सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याही निदर्शनास आली आहे. त्यांनी सांगितले की, मुलीचे पालक सध्या प्रचंड मानसिक तणावात असून, त्यांच्यावर दबाव आहे. ही घटना आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी लवकरच गावात भेट देऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
पीडित मुलीची तात्काळ वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असून, तिच्या कुटुंबाला योग्य संरक्षण मिळणे आवश्यक आहे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.








