अहिल्यानगरकरांनो मॅगी खाताय जरा जपून! मॅगीच्या पॅकेटामध्ये आढळली मृत पाल

0
33

अहिल्यानगर : घराघरात लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच मॅगी आवडते. अशा मॅगीप्रेमींना धक्का देणारी घटना अहिल्यानगर शहरात समोर आली आहे. प्रसिध्द खाद्यपदार्थ कंपनी नेस्ले इंडिया यांच्याकडून तयार करण्यात येणार्‍या मॅगीच्या पॅकेटमध्ये चक्क मृत पाल आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार येथील अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल करण्यात आली असून, संबंधित घटनेची चौकशी सुरू झाली आहे.

बोल्हेगाव उपनगरातील रहिवासी नीलेश दादासाहेब दिवे यांनी, सावेडी उपनगरातील मॉलमधून खरेदी केलेल्या मॅगीच्या पाकिटामध्ये मृत पालीचे पिल्लू आढळले. यासंदर्भात त्यांनी उत्पादक कंपनी व मॉलवर कारवाई करावी, अशा मागणीचा तक्रार अर्ज अन्न व औषध प्रशासन विभागाकडे दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणावर अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या प्रकरणाची माहिती केंद्रीय परवाना अधिकाऱ्यांना ईमेलव्दारे पाठवण्यात आली असून, संबंधित उत्पादनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, नेस्ले कंपनीच्या स्थानिक डिस्ट्रीब्युटरची देखील तपासणी केली जाणार आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कंपनीने अधिक जबाबदारीने आणि काटेकोरतेने वागण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशी अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here