राहाता शहरात सिंहाचा वावर? बिबट्यापाठोपाठ सिंहाचीही दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
89

राहाता शहरातील सदाफळ वस्ती व मावलाया रोड परिसरात सिंह दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीच बिबट्यांच्या दहशतीने हैराण झालेल्या नागरिकांवर आता सिंहाच्या शक्यतेने भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे.

अनेकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केल्याचे बोलले जात आहे. सदाफळ वस्ती परिसरात रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत मजुरांना सिंह दिसला असता त्यांनी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. तो सिंह होता की नाही, याची अधिकृत पुष्टी अद्याप वनविभागाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, व्हिडिओच्या आधारे काहींनी तो सिंह असल्याचा ठाम दावा केला आहे.

दरम्यान, राहाता तालुक्यात याआधीही बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक मुले व पाळीव प्राण्यांचे बळी गेले आहेत. काही ठिकाणी प्राणघातक हल्लेही झाले आहेत. वनविभागाकडून सतत पिंजरे लावले जात असले तरी बिबट्याचा वावर अद्यापही कायम आहे. अशातच आता सिंहाचे दर्शन झाल्याचा दावा समोर आल्याने नागरिक, शेतकरी आणि शेतमजूर प्रचंड घाबरले आहेत.

“सिंह हा नेमका कुठून आला? जंगलापासून कोसो दूर असलेल्या राहाता शहरात तो कसा पोहोचला?” या प्रश्नांनीही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. वनविभागाने तातडीने हालचाल करून घटनास्थळी पिंजरे लावून संभाव्य सिंह किंवा बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

सध्या नागरिक आपल्या घराबाहेर निघण्यासही घाबरत असून, शेतकरी व शेतमजूर आपल्या शेतीत जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात आहेत. वनविभागाकडून या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्वरित तपासणी करून सत्यता स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here