अहिल्यानगर : जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारीच्या विळख्यात सापडलेल्या शेतकरी व छोट्या व्यावसायिकांच्या आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सावकारांकडून 5 ते 20 टक्के दराने बेकायदेशीरपणे व्याज आकारले जात असून, जबर वसुली करून अनेकांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात आहे. या पाशवी सावकारी जाचाला आळा बसावा, तसेच अशा सावकारांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
जिल्ह्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९ नुसार आतापर्यंत २० गुन्हे दाखल झाले असून, अजूनही बरेच पीडित शेतकरी व नागरिक भीतीपोटी तक्रार करत नाहीत. अशांनी पुढे येऊन सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट निर्देश दिले की, बेकायदेशीर सावकारीबाबत तक्रार प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही केली जावी. तसेच तक्रारी निकाली काढताना संबंधितांना नोटीस बजावल्याची खात्री करूनच निर्णय घ्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले. फक्त सहकार खात्याकडून अधिकृत परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, यामुळे अवैध सावकारांची संख्या कमी होईल आणि कर्जदारांचे शोषण टळेल, असे डॉ. आशिया यांनी सांगितले.
सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनीही नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करत, बेकायदेशीर सावकारांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक तथा सावकारांचे निबंधक मंगेश सुरवसे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते.








