श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर ३ बाजरतळ येथील एका घरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ₹७९,९७० किमतीचा अवैध मद्यसाठा व दारू मद्यार्कसह बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर शहरातील बाजारतळ (वॉर्ड क्र. ३) आणि खबडी (वॉर्ड क्र. १) या भागात मंगळवारी दुपारी धाड टाकण्यात आली. यादरम्यान कारखान्यात विदेशी दारूच्या बनावटी बाटल्या तयार केल्या जात असल्याचे आढळून आले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या पथकाने कारखान्याच्या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध स्पिरीट, बनावटी दारूच्या बाटल्या, तसेच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. अटकेतील आरोपींमध्ये मनोज पवार, शुभम पवार, बाळू फुलारे आणि एका महिलेचा समावेश आहे.
ही संयुक्त कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने स्थानिक पोलिस, आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








