कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी दागिने लुटले; चार जण जखमी, २४ हजारांचा ऐवज लंपास

0
48

पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथील वाण्याचा मळा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत घरात घुसून महिलांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेत चार जण जखमी झाले असून सुमारे २४ हजार ९०० रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली आहे.

याप्रकरणी शिवाजी बबन कळमकर (वय ४५, रा. वाण्याचा मळा, पळवे बुद्रुक) यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीदरम्यान शिवाजी कळमकर, मंगल कळमकर, ऋतुजा चितळकर आणि हौसाबाई येळे हे जखमी झाले आहेत.

चोरट्यांनी घरात प्रवेश करताच कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे डोरले, दोन पळ्या, ३० सोन्याचे मणी, दोन सोन्याच्या नथ, दोन भाराचे चांदीचे जोडवे आणि रोख ९०० रुपये असा मिळून २४,९०० रुपयांचा ऐवज लुटला. याशिवाय घरातील ४३ इंची टीव्ही फोडून नुकसानही केले आहे. चोरट्यांनी प्रतिकार करणाऱ्या महिलांना “दागिने द्या, नाहीतर बोटे तोडू” अशी धमकी दिली होती.

या घटनेदरम्यान चोरट्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. फिर्यादी झोपेत असताना चोरट्यांनी कटावणीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला होता. या घटनेप्रमाणेच गावातील किसन राघू जाधव यांच्या घरातून ३ हजार रुपये रोख आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने, तसेच संजय मारुती येळे यांच्या घरीही मारहाण करत दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत. गावात भीतीचं वातावरण असून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here