अहिल्यानगरमध्ये बनावट पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक; १७.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
46

अहिल्यानगर : भारतीय चलनातील हुबेहूब बनावट पाचशे रुपयांच्या नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे १७ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बनावट नोटा व महिंद्रा थार गाडीचा समावेश आहे.

सोमनाथ माणिक शिंदे (तपोवन रस्ता, अहिल्यानगर) आणि निखिल शिवाजी गांगर्डे ( कोंभळी, कर्जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी शिवाजी गांगर्डे याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर आजारी असलेल्या सोमनाथ शिंदेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून त्याच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवण्यात आला आहे.

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली. गीते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास रुईछत्तीस (ता. नगर) परिसरात सापळा रचून संशयित वाहन (एमएच १६ डीएल २७९७) थांबवण्यात आले व दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या तपासानुसार, बनावट नोटा मध्य प्रदेशातील सेंधवा येथून आणण्यात आल्या होत्या. एका मोबाइल अॅपच्या माध्यमातून सेंधवामधील व्यक्तीने या दोघांना ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या.

आरोपी जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातूनच मोबाइल अॅप रॅकेटच्या जाळ्यात अडकून त्यांनी बनावट नोटा चलनात आणण्याचा कट रचला. काही काळापूर्वी राहुरी पोलिसांनी देखील अशाच प्रकारच्या बनावट नोटा प्रकरणात दोन जणांना अटक केली होती. या घटनेमुळे बनावट नोटा रॅकेटचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here