संगमनेर : तीर्थक्षेत्र श्री बिरोबा देवस्थान साकूर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात येथील लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात बिरोबा यात्रेचा उत्सव होत असतो. नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा भरते.
यंदाच्या वर्षी २९ जुलै रोजी नागपंचमी व ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनचा सण आहे. या दोन्ही दिवशी लाखो भाविक बिरोबारायाच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यामुळे यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विरभद्र देवस्थानच्या वतीने सुसज्ज नियोजन करत यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भाविकांना बिरोबारायाचे दर्शन होण्यासाठी सुसज्ज अशी दर्शनबारी तयार केली आहे.
साकूर येथील पठार भागाचे आराध्यदैवत असणाऱ्या जागृत देवस्थान वीरभद्र बिरोबाच्या यात्रेसाठी परराज्यासह राज्यभरातून तसेच अहिल्यानगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबईसह अशा विविध ठिकाणांहून लाखो भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी यात्रा कमिटीने केली आहे.
विशेषतः नारळी पौर्णिमेच्या दिवशी भाविक गंगेचे पाणी कावडीने पायी आणत बिरोबारायाला गंगास्नान घालतात. तसेच यात्राकाळात वाण, ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील वाटप केले जात असून विशेषतः अनेक स्वयंसेवक व तरूणांचे सहकार्य होत असते. त्यामुळे यात्राकाळात साकूर परिसर भक्तीमय वातावरणात फुलून गेलेला दिसत आहे.








