शिर्डीचं साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

0
75

शिर्डी : साईबाबा मंदिराला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे. साईबाबा संस्थानच्या अधिकृत ई-मेलवर आलेल्या मेलमध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमकीनंतर मंदिर प्रशासनाने तातडीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंदिर परिसरात साईभक्त आणि कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘भगवंत मान’ या नावाने साईमंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीत दुपारी १ वाजेपर्यंत समाधी स्थळ आणि द्वारकामाईमध्ये ठेवलेले ४ नायट्रीक बॉम्ब सक्रिय होतील, त्यामुळे भाविक व कर्मचारी यांना बाहेर काढावे अशी धमकी दिली होती. मंदिर संरक्षण अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे महिन्यातही अशाच प्रकारे साईमंदिराला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा धमकीचा मेल आल्याने पोलीस व संस्थान प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क केली आहे.

या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक पथकाने मंदिर, परिसर आणि दर्शनरांगेची सखोल तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरीही खबरदारी म्हणून सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत. पूर्वी आलेल्या धमकीच्या मेलची तपासणी सुरू असून, आज प्राप्त झालेल्या मेलसंदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here