अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील सरळसेवा भरती आणि पदोन्नती मिळून एकूण १७,०२० पदे मंजूर आहेत. यापैकी १५,०६९ पदे भरली गेली असून अजूनही १,९५१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये गट ‘क’ मधील १,६४० तर गट ‘ड’ मधील ३११ पदांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
१ जुलै २०२५ रोजी गट ‘क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची १४,२३३ पदे मंजूर होती. त्यापैकी १३,१२३ पदे भरली असून १,११० पदे अद्याप रिक्त आहेत. पदोन्नतीसाठी गट ‘क’ मधील १,८८२ पदांपैकी १,३५२ पदे भरली असून ५३० पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे गट ‘क’ ची एकूण १६,११५ मंजूर पदांपैकी १४,४७५ पदे भरली गेली असून अजून १,६४० पदे रिक्त आहेत.
१ जुलै २०२५ रोजी गट ‘ड’ संवर्गातील सरळसेवा भरतीची ८३९ पदे मंजूर होती. त्यापैकी ५५१ पदे भरली असून २८८ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीसाठी मंजूर ६६ पदांपैकी ४३ पदे भरली असून २३ पदे रिक्त आहेत.
एकूण भरतीचा आढावा
दोन्ही गटांसाठी मंजूर सरळसेवा भरतीची १५,०७२ पदांपैकी १३,६७४ पदे भरली असून १,३९८ पदे रिक्त आहेत. तर पदोन्नतीसाठी मंजूर १,९४८ पदांपैकी १,३९५ पदे भरली गेली असून अजून ५५३ पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी जनतेच्या कामांमध्ये विलंब होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे








