संगमनेर शहर पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई, ९२ हजारांचा गुटखा केला जप्त

0
33

संगमनेर :  शहर पोलिसांनी गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री साडेअकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ज्ञानमाता हायस्कूलसमोर करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिगाव (ता. संगमनेर) येथील संजय सदाशिव उगलमुगले आणि चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथील सागर शिवाजी सोनवणे हे महिंद्रा झायलो (एमएच ४६ ए २९२९) गाडीतून हिरा पान मसाला आणि रॉयल ७१७ तंबाखू विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली.

त्यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने ज्ञानमाता विद्यालयाजवळ वाहनाला अडवून तपासणी केली असता विविध कंपन्यांचा गुटखा आढळला. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीची सिल्वर रंगाची महिंद्रा झायलो गाडी आणि ९२ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलिस शिपाई रामकृष्ण मुखरे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संजय उगलमुगले आणि सागर सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुटखा विक्री व वाहतूक हा कायद्याने प्रतिबंधित गुन्हा असूनही, काहीजण मोठ्या प्रमाणावर गुप्तपणे गुटखा विक्रीसाठी शहरात आणत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या बेकायदेशीर व्यवसायावर आळा बसला आहे. मात्र गुटखा पुरवठा साखळीमागील इतर आरोपींचा शोध घेणे पोलिस प्रशासनापुढील महत्वाचे आव्हान असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here