कापरी नदीतील अवैध वाळू उपशावर पहाटे कारवाई; ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
47

अहिल्यानगर :  नांदगाव शिवारातील कापरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि. १९) पहाटे अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या वेळी चार डंपर, आठ ब्रास वाळू, एक दुचाकी असा एकूण ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. खाडे यांना नांदगाव शिवारातील कापरी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू उपसली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी पहाटे कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

खाडे यांनी त्यांच्या पथकासह कापरी नदी परिसरात दबा धरला. काही अंतरावर वाहने उभी करून थेट नदीपात्रात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच सात जण घटनास्थळावरून पळून गेले, मात्र एका संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईत चार डंपर, आठ ब्रास वाळू व एक दुचाकी असा एकूण ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आधीही या पथकाने नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात कारवाई करत वाळूने भरलेले डंपर पकडले होते. ही दुसरी मोठी यशस्वी कारवाई ठरली आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीला जोरदार फटका बसला आहे. विशेषतः शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील वाळूमाफियांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी वाळू उपसा व वाहतूक थांबवण्यात आली आहे.

ही कारवाई परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, अजय साठे यांच्या पथकाने केली. त्यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here