पारनेर : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी झालेल्या कथित गैरव्यवहारात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कारखाना साईटवरील अंदाजे १५० कोटी रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी स्थलांतरित केल्याचे पोलीस पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कारखान्याची पाहणी करत हा प्रकार उघडकीस आणला असून, या पार्श्वभूमीवर आता पोलिसांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मशिनरी आणि पेट्रोल पंप गायब
या प्रकरणी फिर्याद कारखाना बचाव समितीने दिली असून, कारखान्यातील मुख्य मुद्देमाल असलेल्या मशिनरीचा पंचनामा करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती. शुक्रवारी सायंकाळी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारखाना साईटची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी संबंधित मशिनरी साईटवरून हलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय कारखाना साईटवरील पेट्रोल पंपही गायब असून त्याचाही स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींविरोधात जानेवारी महिन्यात पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर काही काळासाठी स्थगिती मिळाली होती. मात्र, २ जुलै रोजी सत्र न्यायालयाने ती स्थगिती उठवली आणि आरोपींना तपासास सामोरे जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
गुन्ह्याची व्याप्ती आणि प्रमुख आरोपी
या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची एकूण व्याप्ती सुमारे ४०० कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी अनंत भुईभार, अनिल चव्हाण, तसेच क्रांती शुगर कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडूरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकु नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले आणि निवृत्ती नवले हे प्रमुख आरोपी आहेत.
कारखाना बचाव समितीचा आग्रह
या गंभीर प्रकरणातील मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कारखाना बचाव समितीने केली आहे. पंचनाम्यावेळी समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, पुढील काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.








