कृषी क्षेत्रात पाच वर्षांत 25 हजार कोटींची करणार गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0
59

पंढरपूर : शेती फायद्याची व्हावी, कमी उत्पादन खर्चात उत्पादन वाढ यावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजन पासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतेच पिक विमा योजना सुधारित केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

शेतक-यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाच्या प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतक-यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतक-यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल, असा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रशांत परिचारक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here