संगमनेर : मालपाणी लॉन्स हॉल, संगमनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहकार्याने घरेलू कामगार महिलांना भांडी वाटप करण्यात आले. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
संगमनेर शहर आणि परिसरात अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील आशा महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. घरेलू कामगार महिला भगिनी अनेक घरात स्वच्छता, स्वयंपाक व इतर कामांद्वारे समाजात मोलाचे योगदान देत आहेत.
यावेळी उपस्थित आमदार अमोल खताळ म्हणाले, फक्त वस्तू वाटप नव्हे तर, या भगिनींना सन्मानित करण्याचा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. महिला भगिनींची आत्मसन्मानाने जगण्याची जिद्द संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.
कष्टकरी माय-भगिनींना भांडी वाटपाच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. घराघरात कष्ट करणाऱ्या भगिनींसाठी हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणार आहे, असा विश्वास शिवसेना महायुतीच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.








