लोणी : महाराष्ट्राची अखंड अध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या पंढरीच्या वारीचे प्रतिकात्मक रूप ‘वारी पंढरीची… ज्ञानगंगा प्रवरेची’ हा भव्य सोहळा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सुमारे १५ हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या सहभागाने लोणी येथे उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थांनी भव्य रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून प्रति पंढरपूर निर्माण केले.
लोणी येथे शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावांमधून शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक दिंड्या घेऊन सहभागी झाले. तसेच, प्रवरा परिवाराच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, तांत्रिक महाविद्यालयांतील विद्यार्थी टाळ-मृदुंगांच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात सहभागी झाले. यावेळी विविध गावांमधून निघालेल्या दिंड्यांचे सहकार नगरीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
या वारीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेषभूषेत रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. भगवे झेंडे, घोडेस्वार, टाळ मृदुंगांच्या गजरात रंगलेला हा सोहळा प्रेक्षणीय ठरला. जिल्ह्यातील नामवंत महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, प्रमुख देवस्थानांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणारी ठरली.
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमामागे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांची संकल्पना असून, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाबासाहेब विखे पाटील यांच्या वारकरी परंपरेतील योगदानाची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात आला. प्रसंगी संपूर्ण लोणी व परिसर ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ च्या गजराने निनादला आणि हा अध्यात्मिक सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.








