मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये थेट १५ टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ जून २०२५ रोजी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेची घोषणा केली होती. ही सवलत लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांसाठी असणार आहे. ही योजना सर्व प्रकारच्या एसटी बस सेवा जसे की शिवशाही, आसन आराम बस, सेमी लक्झरी, पारंपरिक लालपरी यांमध्ये लागू करण्यात आली आहे.
गर्दीचे हंगाम जसे की दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या किंवा विशेष प्रसंगी या योजनेतून वगळण्यात आले आहेत. कारण या कालावधीत एसटीच्या बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असतात आणि प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे ही योजना वर्षभर लागू असली तरी गर्दीच्या पिक सीझनमध्ये सवलत मिळणार नाही.
या योजनेमुळे प्रवाशांना आर्थिक बचतीबरोबरच आपला प्रवास निश्चित करण्याची सोय होणार आहे. वेळेपूर्वी आरक्षण केल्यास बसमध्ये जागा निश्चित मिळेल आणि तिकीट दरात थेट १५ टक्के सूट मिळेल. यामुळे प्रवाशांमध्ये आगाऊ आरक्षणाची सवय निर्माण होईल आणि एसटी व्यवस्थापनालाही प्रवासी नियोजन करण्यात मदत होईल.
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, वारंवार प्रवास करणारे व्यापारी यांना ही योजना विशेष फायदेशीर ठरणार आहे. महागाईच्या काळात प्रवास खर्चात थोडी बचत होणे हे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.








