PWD ची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, ठेकेदारांवर कारवाई करा; आ. अमोल खताळ यांची विधानसभेत ठाम मागणी

0
100

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 30 जूनपासून सुरू झालं आहे. मंगळवारी पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना मांडून मायबाप शासनाचे विविध प्रश्नांवर लक्ष वेधले.

आमदार अमोल खताळ यांनी पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करत, पर्यटनस्थळ तेथील बांधकाम आणि पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट याबाबत प्रश्न उपस्थित केले. लक्षवेधी सूचना मांडताना आमदार खताळ म्हणाले, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गोळा होत असतात. अशा पर्यटनस्थळी वास्तू धोकादायक असल्याचे बोर्ड लावले जातात. मात्र त्यादृष्टीने सुरक्षा उपाययोजना केली जात नाही. इंद्रायणी येथील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांना धोकादायक पुलावर चढू देण्यास मनाई का करण्यात आली नाही. जर तेथील प्रशासकीय व्यवस्था याला जबाबदार असेल तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आज पर्यंत कारवाई झाली नाही.

भविष्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत की ज्या ठिकाणी असे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासनाने जर या पुलासाठी मागील वर्षी निधी मंजूर केला होता पण वर्क ऑर्डर निघायला दीड वर्षांचा कालावधी लागला, अशीच विकास कामे जर लाल फितीत अडकत राहिली तर विकास कामे कशी होणार? याप्रकरणी जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का? असे सवाल आमदार अमोल खताळ यांनी केले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द व संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिशकालीन जुना पूल आजही वापरात आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यावश्यक आहे. तसेच तालुक्यातील व राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून किती दिवसांत पुनर्बांधणी होणार? हा मुद्दा उपस्थित करून आमदार अमोल खताळ यांनी शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना आमदार खताळ पुढे म्हणाले, PWD ची अनेक कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. शासन निधी खर्च करायला तयार पण परिणाम काहीही नाही, ही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत! ही बाब लक्षात घेता वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी लक्षवेधी सूचना आमदार अमोल खताळ यांनी शासनाकडे मांडली.

दरम्यान, राज्याचा कारभार कसा चालू आहे याचा आढावा अधिवेशनाच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. अधिवेशनात प्रामुख्याने आमदार विविध विषयांवर प्रश्न विचारून संबधित खात्याच्या मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पडतात. या आमदारांचे सभागृहातील सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे लक्षवेधी सूचना होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here