उत्तराखंडातील मराठी बांधवांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार, तातडीने संपर्क आणि मदतीचे आश्वासन

0
53

मुंबई : उत्तराखंडमध्ये भीषण पावसामुळे अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. परिणामी, हजारो पर्यटक या भागात अडकले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे १५० ते 200 मराठी पर्यटकांचा समावेश आहे.

उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळील जानकीचट्टी गावात २८ जूनपासून हे पर्यटक अडकून पडले आहेत. या भागातील रस्ते दरड कोसळून पूर्णतः बंद झाले असून, रस्ता पूर्ववत होण्यासाठी किमान आठ दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अडकलेल्या मराठी पर्यटकांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपला व्यस्त कार्यक्रम बाजूला ठेवत तातडीने या पर्यटकांशी थेट संवाद साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकाशी फोनवर संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि शक्य ती सर्व मदत पोहोचवण्याची ग्वाही दिली. यावेळी शिंदे यांनी पर्यटकांना धीर देत, “महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे, तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तर तात्काळ संपर्क साधा,” असा संदेश दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासोबत तसेच त्यांच्या कार्यालयात कार्यरत पराग दकाते यांच्याशी संपर्क साधून, अडकलेल्या पर्यटकांसाठी अन्न, पाण्याची आणि इतर आवश्यकतेची तातडीने व्यवस्था करण्याची विनंती केली.

उत्तराखंड सरकारनेही त्वरित प्रतिसाद देत मदतीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती दिली.
सध्या उत्तराखंड प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून, लवकरात लवकर मार्ग मोकळे करून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी बांधवांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा तत्पर पुढाकार निश्चितच दिलासा देणारा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here