अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांचा अजित पवार गटात प्रवेश, प्राजक्त तनपुरेंना मोठा धक्का

0
56

राहुरी : डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, बाजार समितीचे सभापती आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री राहुरी येथील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीने प्राजक्त तनपुरेंच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरे गटाने एकतर्फी विजय मिळवून कारखान्यावर वर्चस्व मिळवले होते. कारखान्याच्या भविष्यासाठी सत्तेच्या जवळ राहणे गरजेचे आहे, असे भाष्य करून अरुण तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. अखेर ही चर्चा प्रत्यक्षात आली असून, त्यांच्या प्रवेशाने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.

या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण मध्यस्थी केली. प्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच, येत्या आठवड्यात अरुण तनपुरे यांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. आता याबाबत प्राजक्त तनपुरे यांची काय भूमिका असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर हा राजकीय बदल किती परिणामकारक ठरेल, हे येणारा काळच सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here