संगमनेर : अनेक वर्षांपासून संगमनेर शहरातील वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूक कोंडी त्रासदायक ठरत आहे. शहरातील मुख्य भाग तीनबत्ती चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्थानक परिसर, अकोल्याकडे जाणारा रस्ता, पेटीट हायस्कूल सर्कल, बाजार समिती परिसर या ठिकाणी सतत ट्राफिक जाम होत असते. मात्र आता आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक काळात संगमनेरकरांना वाहतुक कोंडीचा प्रश्न मिटवण्याचे आश्वासन दिले होते. यानिमित्ताने आश्वासन पूर्तीकडे पहिले पाऊल टाकले आहे.
प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आता सुसाट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतुक कोंडी होणार्या सर्वच ठिकाणी वाहतुकीचे निर्बंध घालून देण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सिग्नल यंत्रणा प्रशासनाने पुन्हा दुरुस्त करून आधुनिक पद्धतीने कार्यान्वित केल्या आहेत. या सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक अधिक सुकर झाली असून, वाहनचालकही आता वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करतील असा विश्वास आहे.
अनधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने रस्ते मोकळे राहतात. बहुतांश जड वाहतुक बायपास रस्त्याने वळवण्यात आली आहे.त्यामुळे शहरातून होणारी ट्रक, कंटेनरची रहदारी पूर्णतः थांबली असून, शहरात फक्त हलकी वाहने आणि प्रवासी वाहतूक सुरु आहे.
संगमनेर शहरातील बदललेल्या या वाहतुक व्यवस्थेवर नागरिकांची सकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता शहरात मोकळेपणाने वाहन चालवता येईल, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.








