पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 वा पालखी सोहळा देहू येथे साजरा होतोय.आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी आज (बुधवारी) दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी पायी वारीत सहभागी झाले आहेत.
प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे. त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
मंदिरात ४२ व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे.
यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन पुढे चालत असतात.
संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक
18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
(इंदापूर येथे गोल रिंगण )
30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
(माळीनगर येथे उभे रिंगण )
3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
(वाखरी येथे उभे रिंगण )
6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान








