अहिल्यानगर : जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, गेल्या पाच महिन्यांत तब्बल ९४० महिला व २४६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महाविकास आघाडीच्या महिला प्रतिनिधींनी यासंदर्भात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मागील चार वर्षांत राज्यातून १३ लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्याचा दावा केला. बेपत्ता महिलांची आकडेवारी केवळ सरकारी नोंदीत राहू नये, तर यासंदर्भातील कारणे शोधून उपाययोजना झाल्या पाहिजे.
अहिल्यानगरमधील पोलिसांनी या प्रकरणी शोध मोहिमा हाती घेतल्या असून, काही प्रमाणात यश मिळालं आहे. मार्च महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेद्वारे ४४० महिलांचा शोध घेण्यात आला. मात्र अजूनही अनेक महिला व मुली बेपत्ता आहेत.
दररोज सरासरी एक ते दोन अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत. या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागे प्रेमसंबंध, फसवणूक, घरगुती हिंसाचार, तसेच काही वेळा जबरदस्तीने अपहरणही कारणीभूत ठरत असल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर पालकांनी अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे. मुलींच्या वावरावर लक्ष ठेवणे, त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या संवादावर विश्वास ठेवणे हे पालकांचे कर्तव्य ठरते.
महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी केवळ पोलिसांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. समाज आणि शासनाने संयुक्तपणे प्रयत्न करणे, विशेष मोहिमा राबवून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणे आणि अशा घटनांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे.








