मुंबई : आषाढी एकादशीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने वारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारीसाठी प्रवास करणारे वारकरी त्यांची वाहने तसेच मानाच्या पालख्या आणि अन्य भाविकांना टोलमाफी देण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला असून, 18 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत ही टोल सवलत लागू असणार आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या 10 मानाच्या पालख्या आणि त्यांच्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी ही टोलमाफी लागू राहणार आहे.
या निर्णयाचा लाभ जड आणि हलक्या अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांना मिळणार आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या हजारो भाविकांना आणि वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा यंदा 6 जुलै रोजी होणार आहे. 26 जूनपासून यात्रा सुरू होत असून 10 जुलैपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. या काळात विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात एसटी बस आणि खासगी वाहनांद्वारे भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात.
भाविकांच्या सोयीसाठी भीमा बस स्थानकावर तात्पुरते तीन जलरोधक मंडप (५,००० चौरस फुटाचे) आणि ३०० सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.








