अहिल्यानगरात भाजपचा मोठा बदल अनिल मोहिते झाले शहर जिल्हाध्यक्ष!

0
55

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याची निवड करत अनिल मोहिते यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवारी भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाजपच्या उत्तर, दक्षिण आणि शहर जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी एक महत्वाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीसाठी पक्ष निरीक्षकांचीही उपस्थिती होती. उत्तर भागासाठी नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली, तर दक्षिण विभागाचे दिलीप भालसिंग यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली.

शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रदेश स्तरावरून होणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. या पदासाठी अनेक इच्छुकांमध्ये चुरस होती. तिरंगा रॅलीसारख्या महत्वाच्या पक्षकार्यक्रमांची जबाबदारी काही नेत्यांकडे देण्यात आली होती. या यादीत सध्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांचेही नाव होते, त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेत अनिल मोहिते यांची निवड केली.

या निवडीसाठी शहरात जोरदार स्पर्धा होती. भाजपचे उपाध्यक्ष सचिन पारखी, बाबा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि धनंजय जाधव यांच्यासह अनेक दिग्गज या पदासाठी इच्छुक होते. या सर्वांनी आपली उमेदवारी पक्षाकडे सादर केली होती.

या प्रक्रियेत मुंबईत पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून अंतिम निर्णयासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अनिल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची निवड निश्चित केली. पक्षाच्या या निर्णयामुळे एक नवीन नेतृत्व पुढे आल्याचे स्पष्ट होते, आणि भविष्यात शहरातील भाजपची घोडदौड अधिक वेग घेईल, अशी अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, अनिल मोहिते यांनी २००९ मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या काळात त्यांनी भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचारही केला होता. मात्र अलीकडे पुन्हा भाजपमध्ये पुनर्प्रवेश करत त्यांनी पक्षाच्या विश्वासास पात्र ठरत हे महत्वाचे पद भूषवले आहे.

पक्षात सुरू असलेल्या नाराजी व अंतर्गत मतभेदांमुळे ही निवड काही काळासाठी लांबली होती. पण अखेरीस मोहिते यांचे नाव अधिकृतरित्या घोषित झाले असून, त्यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरूच होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here