संगमनेर : संगमनेर तालुक्यातील खांबे गावाच्या दीर्घकालीन पाणी टंचाईच्या समस्येवर मोठा तोडगा निघाला आहे. कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी खांबे गावात स्वतंत्र जॅकवेल व पंप हाऊस उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली आहे. ही परवानगी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः ग्रामस्थांच्या हस्ते पत्राद्वारे सुपूर्त केली. या निर्णयामागे आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
खांबे गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर आमदार खताळ यांनी या मागणीचा गांभीर्याने पाठपुरावा केला. त्यानंतर जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करताना विशिष्ट अटी व अडचणींचा विचार करून म्हैसगाव तास येथील पुलाजवळ मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात, धरणाच्या भीतींपासून सुमारे २२ कि.मी. अंतरावर तीन गुंठे जागेवर जॅकवेल, अप्रोच ब्रिज व पंप हाऊस उभारण्यास ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. या निर्णयामुळे गावाला स्वतंत्र जॅकवेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविवारी झालेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील, आमदार खताळ, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उपस्थितीत खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर व ग्रामस्थांच्या हस्ते अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.या निर्णयामुळे खांबे गावाच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, “पठार भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही केवळ सुरुवात असून, उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आहे. मंत्री विखे पाटील यांचे सहकार्य आम्हाला सातत्याने लाभत आहे.
”सरपंच रविंद्र दातीर यांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत, “खांबे गावासाठी हे एक मोठं पाऊल असून, लवकरच जॅकवेल व पंप हाऊसचे काम पूर्ण करून गावासाठी पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण करू,” अशी प्रतिक्रिया दिली.
हा निर्णय म्हणजे खांबे गावासाठी विकासाच्या दिशेने टाकलेलं एक आशादायक पाऊल आहे.








