बँक आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करून कर्ज प्रक्रियेला गती देण्याचे आदेश
अहिल्यानगर – जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर असताना, शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत आणि विनाअडथळा मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बँक आणि प्रशासनाला समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गावपातळीवर कॅम्प घेऊन अर्ज प्रक्रिया सुलभ करा आणि पात्र शेतकऱ्यांना कर्ज नाकारू नका, असे त्यांनी बजावले.
१०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश
जिल्हास्तरीय बैंकर्स समितीच्या बैठकीत बोलताना डॉ. आशिया यांनी सांगितले की, बँकांनी ठरवून दिलेले पीककर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले पाहिजे. रिझर्व्ह बँक, नाबार्ड, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विभाग यांच्यासह विविध शासकीय प्रतिनिधींना उपस्थितीत त्यांनी गावपातळीवर कॅम्प घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा सल्ला दिला.
प्रलंबित अर्जांवर त्वरित कारवाई करा
प्रलंबित कर्ज अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी बँकांना सूचित करण्यात आले आहे. शासकीय योजनांमधील कर्ज प्रकरणांमध्ये विलंब होणार नाही याची काळजी घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. बँकांकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचेही आदेश देण्यात आले.
‘आई’ पर्यटन धोरणावर विशेष भर
महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘आई’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. जिल्ह्यातील पर्यटनस्थळी विशेष कॅम्प घेऊन महिलांना कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करावे आणि त्यांना उद्योजकतेकडे प्रवृत्त करावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हितासाठी निर्णय
जिल्हा पत आराखडा २०२५ चे विमोचन करताना डॉ. आशिया म्हणाले की, बँकांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शेतीमध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी बँक, प्रशासन आणि शासकीय संस्था यांचे समन्वयबद्ध कार्य गरजेचे आहे.








