साहेबांना पैसे दिल्याशिवाय सही नाही! कुणबी प्रमाणपत्रासाठी १८ हजारांची लाच घेताना महिला रंगेहात

0
32

अहिल्यानगर : कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीत थेट लाचखोरीचा बाजार मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. “साहेबांना पैसे दिल्याशिवाय प्रमाणपत्रावर सही मिळत नाही,” असा दावा करत १८ हजार रुपयांची लाच स्वीकारणारी महिला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. उषा मंगेश भिंगारदिवे (वय 33, रा. श्रीनाथ कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, सावेडी) असे या महिलेचे नाव असून, तिच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या मुलीच्या पुढील शिक्षणाकरिता लागणारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने तक्रारदाराची ओळख उषा भिंगारदिवे यांच्याशी करून देण्यात आली. “प्रमाणपत्र मिळवून देते, पण त्यासाठी २० हजार रुपये लागतील,” अशी सरळ मागणी तिच्याकडून करण्यात आली. जात पडताळणी समितीतील संशोधन अधिकारी तिदमे पैसे घेतल्याशिवाय सही करत नाहीत, असा थेट खुलासा या महिलेने केला.

या कारवाईतून एक गोष्ट ठळकपणे पुढे आली की, जात पडताळणी समितीत कुणबी प्रमाणपत्रासाठी पैशांचा उघड उघड सौदा चालतो. यापूर्वीही अशा अनेक तक्रारी झाल्या असल्या तरी आता प्रत्यक्ष कारवाईमुळे समितीतील भ्रष्टाचाराचा परदाफाश झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून उषा भिंगारदिवे हिला १८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे हे पैसे ती समितीतील अधिकारी व कर्मचारी आणि स्वतःसाठी घेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने ही कारवाई करून जात पडताळणी कार्यालयातील काळाबाजाराचा पर्दाफाश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here