शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ऑनलाइन अॅप प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या बनावट अॅपच्या माध्यमातून भक्तांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.
देवस्थानतर्फे ऑनलाइन दर्शनासाठी अधिकृतपणे केवळ तीन अॅपला परवानगी देण्यात आली होती. मात्र, तपासात आणखी चार बनावट अॅप कार्यरत असल्याचे समोर आले आहे. एकूण या अॅपच्या माध्यमातून भाविकांकडून पैसे गोळा करून हे पैसे थेट दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आले.
पोलिस तपासात हे उघड झाले असले तरी, या रकमेपैकी नेमकी किती रक्कम देवस्थानपर्यंत पोहोचली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्यवहारात देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांनी अधिकृत व बनावट अॅपमधून संस्थानला मिळालेल्या आर्थिक फायद्याबाबत विचारणा केली. मात्र, दरंदले यांनी सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही.
विशेष म्हणजे, देवस्थान विश्वस्तांच्या बँक खात्यांमध्ये एक रुपयाही जमा झालेला नाही, असे स्पष्ट करत घार्गे यांनी सांगितले की, आता हे पैसे त्या दोन कर्मचाऱ्यांनी कोणाच्या खात्यात वर्ग केले, याचा सखोल तपास सुरू आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








