गटार दुर्घटना: पवार कुटुंबास ३० लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्त; आ. अमोल खताळांकडून पवार व पिंजारी कुटुंबाचे सांत्वन

0
281

संगमनेर :  कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटारीच्या सफाईदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ठेकेदाराच्या आस्थापनेवरील अतुल पवार आणि त्यांच्या मदतीला धावून गेलेला नागरिक रियाज पिंजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मरण पावलेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रियाज पिंजारी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आ. खताळ यांनी व्यक्त केला आहे.

आमदार अमोल खताळ यांनी मदिना नगर येथील जावेद पिंजारी यांच्या निवासस्थानी तर संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुण रियाज पिंजारी यांचाही प्राण यामध्ये गेला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आ. अमोल खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमदार खताळ यांनी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई भूमिका घेतल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सफाई कर्मचारी अतुल पवार यांना वाचविण्यास गेलेला तरुण नागरिक रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या माध्यमातून शासनाकडून भरीव स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. त्यावर आमदार खताळ म्हणाले की, ‘’गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे अटक होणारच. आरोपीने कितीही जामिनासाठी प्रयत्न केला तरी कायद्यापासून पळू शकणार नाहीत.” असी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here