प्रवास टाळा! राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीने धुमाकूळ; पाथर्डी, शेवगाव, जामखेड व नगर तालुक्यात पूरस्थिती

0
72

अहिल्यानगर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून सहा तालुक्यातील २४ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे २२७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

पाथर्डी, शेवगाव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यांतील ओढे-नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पूरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदतकार्य करण्यात येत आहे.

हवामान खात्याने २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमी)

नगर ५८.५, पारनेर २२.३. श्रीगोंदा ४६.७, कर्जत ४५.६, जामखेड ६६.१, शेवगात ५६.९, पाथर्डी ११०.५, नेवासा २५, राहुरी ५.७, संगमनेर ०.४, अकोले ०.४, कोपरगाव ०.१, श्रीरामपूर ४.८, राहाता ६

या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घरगुती वस्तू, जनावरे व मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व पुरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here