नगर जिल्ह्यातील सोनोशी शाळेत आगळावेगळा उपक्रम; ‘डिजिटल लॉकडाऊन’ची कौतुकास्पद संकल्पना

0
28

पाथर्डी : डिजिटल युगाच्या दुष्परिणामांपासून शालेय मुलांचा बचाव करून त्यांचा मानसिक व बौद्धिक विकास घडवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. “डिजिटल लॉकडाऊन” या नावाने ओळखली जाणारी संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांचे लक्ष अभ्यास व मैदानी खेळांकडे वळविणे, तसेच पालक-बालक संवाद अधिक दृढ करणे हा आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारची संकल्पना राबविणारी सोनोशी शाळा ही पहिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शिक्षण विभागाचे शालेय पोषण आहार अधीक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, “टीव्ही, मोबाईल व समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद हरवतोय. हास्यविनोद, खेळ, परस्परांची सुख-दुःखं वाटून घेण्याची संस्कृती कमी होत आहे. त्यामुळे मुले आत्मकेंद्री, चिडखोर होत आहेत. या उपक्रमातून त्यावर सकारात्मक उपाय शोधता येईल.”

या संकल्पनेनुसार रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गावातील सर्व पालकांनी मोबाईल व टीव्ही बंद ठेवून मुलांसोबत अभ्यास करणे, संवाद साधणे, गप्पा मारणे, एकत्र वेळ घालवणे अपेक्षित आहे. त्यामुळे घरात अभ्यासाला पूरक वातावरण तयार होऊन मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक अमोल भंडारी, अण्णासाहेब साळुंखे, बाबासाहेब खेडकर, नारायण दहिफळे, दत्तात्रय दहिफळे, रामदास चौधरी यांचे विशेष योगदान असून ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, सेवा संस्था तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्याची भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here