संगमनेर : गणपती बाप्पाचे सर्वांवर कृपाशीर्वाद कायम राहू द्या आणि या वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. असाच पाऊस दर वर्षी पडत राहो आणि या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी समृद्धी आणि त्यांना चांगले आरोग्य लाभो असे साकडे आमदार अमोल खताळ यांनी गणरायाच्या चरणी घातले.
संगमनेर शहरातील घुलेवाडी रोडवरील आमदार अमोल खताळ यांच्या साईहर्ष या निवासस्थानी आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा आरती करून गणरायाची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील धोंडीबा खताळ,आई मंगल खताळ, भाऊ राहुल खताळ, भावजयी शीतल खताळ यांच्यासह खताळ परिवार उपस्थित होता.
आमदार खताळ म्हणाले की, संपूर्ण देशासह राज्यामध्ये सर्वत्र गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. याहीवर्षी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात केली जात आहे. हे गणराया तुमचे या मतदारसंघातील सर्वच जनतेवर कृपा आशीर्वाद असू द्या आणि सर्वजण एकत्रित राहून गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी आ. अमोल खताळ यांनी केली आहे.








