संगमनेर : अमोल खताळ संगमनेरचा मात्र दिल्लीत देखील माहिती पडलाय, याचा मला अभिमान आहे. अमोलने निवडणुकीत एकच मारली पण सॉलिड मारलीये, समोरील मंडळी अजूनही सावरले नाहीत अशी फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिवसेना आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी रविवारी संगमनेरचा दौरा केला. या दौऱ्यातून आपण आमदार खताळ यांच्या पाठीमागे ठाम उभे असल्याचा संदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. जायंट किलरला सुपर जायंट किलर करायचंय ना… अमोल खताळच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, सगळं मंत्रिमंडळ अमोलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
आम्ही संजय गांधी योजनेचे पद अमोलला दिले. त्याने संधीचे सोने केले. त्यांने निराधारांना आधार दिला. संधीचे सोने करणारा आमदार कोण तर अमोल खताळ, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
संगमनेरमध्ये साखर कारखाना, दूध संघ, संस्था सगळ्या त्यांच्याच होत्या. दूध पण माझे, चहा पण माझा, बिस्कीट देखील माझे, मग जनतेचं काय? म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिले. अमोलने एकच मारली पण सॉल्लिड मारली. दिल्लीत त्याची चर्चा आहे. 440 चा झटका विरोधकांना दिला तरी ते त्यातून बाहेर येत नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली.








