अहिल्यानगर : ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर शनिवारी अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने हाके यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी हाकेंचे नाव न घेता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेतला, असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाके हे पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगर शहराजवळ थोडा वेळ थांबून नाश्ता केला. त्यानंतर ताफा पुढे निघाला असता पाथर्डीजवळील आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या वाहनाला अडवून अचानक हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी काठ्यांनी गाडीवर तुफान मारहाण केली. यात वाहनाच्या काचा फोडल्या गेल्या तर बॉडीवरही मोठी हानी केली.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.








