अकोलेत शासकीय आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग; एक शिक्षक अटकेत, मुख्याध्यापिका व शिपायावर गुन्हा दाखल

0
60

अकोले : तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींची शिक्षकानेच छेडछाड करून विनयभंग केला. दोन वर्षानी ही घटना उघडकीस आली. पीडितेने अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भाऊराव धुपकर या शिक्षकाला अटक केली आहे.

पीडीत विद्यार्थिनी ही इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, सन २०२३ मध्ये ती इयत्ता आठवीमध्ये असताना शाळेच्या निवासी हॉस्टेलमध्ये राहात होती. त्यावेळी शाळेतील शिक्षक धुपेकर याने तिचा व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला. घडलेला प्रकार विद्यार्थिनींनी शाळेची मुख्याध्यापिका कुलथे हिला सांगितला असता तिने “हा प्रकार घरी सांगू नका” असे सांगितले. त्यानंतर धुपेकर याची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली.

पिडीत विद्यार्थिनी ८ वीमध्ये निवासी होस्टेलवर राहत होत्या. शिक्षक धुपेकर याने पीडितेला पकडून तीचा विनयभंग केला. त्यानंतर इयत्ता नववीत असताना धांडे नावाच्या शिपायाने या मुलींचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुख्याध्यापिका कुलथे यांना सर्व प्रकार पीडित मुलींनी वेळोवेळी सांगितला असता झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू, अशी धमकी त्यांना देण्यात येत होती.

हा सर्व प्रकार घरी सांगितला तर घरचे बोलतील या भीतीमुळे कोणतीच घटना घरी सांगितली नाही. त्यानंतर मे उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडे शिपायाची देखील बदली झाली. तेव्हा दहावीला गेल्यानंतर मुख्याध्यापिका तिला सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन बोलू लागल्या व मानसिक त्रास देवू लागल्या. सदरचा मानसिक त्रास सहन न झाल्याने आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरुन आईला कॉल केला व गेल्या २ वर्षांपासून घडलेला सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. पालक व संबंधित पीडित मुली पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here