कोकणगावला पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान; आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी, तात्काळ मदतीसाठी दिल्या सूचना

0
30

संगमनेर : सततच्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोकणगाव, शिवापूर, मेंढवन आणि सावरगाव तळ परिसरात पूरसदृशची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यांमधील ओव्हरफ्लोमुळे ओढ्यांच्या पाण्याने शेती पाण्याखाली गेली असून,  दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या संसारांना मोठा धक्का बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे व भरपाई मिळवून देण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसाने कोसळली. याची माहिती समजतात आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ कोकणगाव शिवापूर संजय भोसले यांच्या वस्तीवर अधिकाऱ्यांच्या समवेत भेट दिली. आमदार खताळ यांनी ओढ्याच्या पाण्यातून पायी जात पडलेल्या घराची पाहणी केली. याच परिसरातील आण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसले असून, त्यांचे पीक नष्ट झाले आहे. तसेच, बाळू नाना साबळे यांच्या घराची भिंत पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. या पडलेल्या घराचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना कशी लवकरात लवकर मदत मिळवून देता येईल याबाबतचे निर्देश दिले आहेत.

वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यावरील म्हसोबा ते माळेगाव मार्ग आणि अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, स्थानिक ग्रामस्थांनी आमदार खताळ यांच्याकडे निवेदन देऊन अमृतेश्वर मंदिराकडे जात असणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी केली. त्यावर आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिल्या.

आमदार अमोल खताळ यांच्यासोबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे, वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, भाजपचे नेते हिरामण वायकर, घनश्याम भोसले, लक्ष्मण घोडे, भारत जोंधळे, रामेश्वर जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, आदिनाथ पवार, महेश जोंधळे यांच्यासह कोकणगाव, शिवापूर, माळेगाव हवेली, वडगाव पान येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here