संगमनेर : तालुक्याच्या ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शासकीय वसतिगृह नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. संगमनेरला नवीन शासकीय वसतिगृह सुरू करावे अशी मागणी आ. अमोल खताळ यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने संगमनेरला नवीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी संगमनेरला येत असतात; मात्र त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. किंवा त्यांना शहराबाहेर महागड्या खाजगी वसतिगृहांचा पर्याय स्वीकारावा लागतो. तसेच वसतिगृह नसल्यामुळे अनेक गरीब व मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.
नवीन शासकीय वसतिगृह सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची निवास, भोजन व अभ्यास करण्याची सोय होऊ शकते. त्यांची शैक्षणिक प्रगती वेगाने होऊन त्यांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण होईल. अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक संधी मिळतील. या वसतिगृहाच्या माध्यमातून तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. यासाठी हे वस्तीगृह सुरू होणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली होती. त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वस्तीगृह सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वस्तीगृहाचा निश्चितच फायदा होणार आहे.
हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बळकटी मिळाली – आमदार अमोल खताळ
संगमनेर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नवीन शासकीय वसतिगृहासाठी मंजुरी देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बळकटी मिळाली आहे. यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या सुविधेमुळे संगमनेर तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाला नवी गती मिळणार आहे.








