शिर्डीतील अस्वच्छता आणि गुन्हेगारी संपवण्यासाठी आलोय! – डॉ. सुजय विखे पाटील यांचा इशारा

0
77

शिर्डी : शिर्डी मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेता, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हार-भगवतीपूर येथे झालेल्या विशेष संयुक्त ग्रामसभेत ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली.

“शिर्डीतील घाण साफ करायला आलोय! जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर अशा मतदारसंघाची मला गरज नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट इशारा दिला.

गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा

या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला गय केली जाणार नाही. महिलांना त्रास देणाऱ्यांवर कायद्याच्या पलीकडे जाऊनही कारवाई केली जाईल. भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या ग्रामसभेत गावात नवे कडक नियम लागू करण्यात आले.

ग्रामसभेत मंजूर झाले कठोर ठराव

गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसभेत पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले:

रात्री १० नंतर डीजे वाजवण्यास बंदी,आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन,गावात फ्लेक्स लावण्यावर बंदी, भाडेकरूंना घरे देताना ग्रामपंचायतीची लेखी परवानगी अनिवार्य, मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, रात्री ९ नंतर दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवणे, रात्री ९ नंतर तीनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास कारवाई

या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ग्रामपंचायतीला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

डॉ. भास्करराव खड़े यांचीही गुन्हेगारीविरोधात भूमिका

यावेळी उपस्थित असलेले डॉ. भास्करराव खड़े यांनी गावातील वाढती गुंडगिरी आणि पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गावाची प्रतिमा मलिन होत असून, पोलिसांनी अधिक तत्परतेने स्थानिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामसभेत ग्रामस्थांनीही आपापले मत मांडले व गुन्हेगारी विरोधात प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here